NEWS :
“इतना सस्ता सौदा कहा मिलेगा, बच्चों को अच्छी किताब दे दो, अच्छा इन्सान मिलेगा” हे वाक्य ल.ई.सी.च्या पुस्तकात वाचलं होतं आणि तेव्हाच ठरवलं होतं की “कमला निंबकर बालभवन” च्या ग्रंथालयाला भेट द्यायला नक्की जायचं. हे वाक्य कमला निंबकर बालभवन शाळेमध्ये अगदी प्रेमाने ग्रंथालय सांभाळणाऱ्या विद्या ताईंच. प्रकाश दादांशी बोलून फलटणला जाण्याचा योग 25 मार्चला जुळूनच आला. सगळं काही डोळ्यात साठविण्याचा दिवस होता तो. ग्रंथालयाचे नाव “इरावती कर्वे ग्रंथालय” पाषाणात कोरलेलं. ग्रंथालयाचा नक्षीदार दरवाजा, साधा आणि सुबक. ग्रंथालयाची विभागणी दोन भागात केलेली. एकाच छताखाली. एक विभाग पहिली ते चौथीसाठी आणि दुसरा विभाग पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी. दोन्ही विभागातील मुले पूर्ण लायब्ररीभर फिरून त्यांना हवं ते पुस्तक घेऊ शकतात. हवं ते पुस्तक वाचू शकतात. अशा पद्धतीची ग्रंथालयाची मांडणी.
प्रत्येक गोष्टीचे काही नाॅर्मस् असतात. तसे ते लायब्ररीचे ही असतात. मुख्यतः मुलांच्या लायब्ररीचे नाॅर्मस् कटाक्षाने पाळावे लागतात. ते सर्व या लायब्ररीमध्ये पाहायला मिळाले. स्वच्छ प्रकाश, खेळती हवा, खूप सारी मुलांना आवडणारी पुस्तके आणि पुस्तकं निवडण्याचं स्वातंत्र्य. त्याचसोबत मुलांसाठी ग्रंथालयाशी संबंधित असलेले वेगवेगळे उपक्रम घेणारे ताई, दादा.
आम्ही अकराच्या दरम्यान ग्रंथालयात पोहोचलो. सकाळच्या पहिली ते चौथीसाठी असणारे प्रदीप दादा आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला ग्रंथालयाची सविस्तर माहिती सांगितली. आत्तापर्यंतचे सगळे रजिस्टार दाखवले. पुस्तकं, मासिकं ठेवण्याची रचना, मुलांनी केलेले काम प्रदर्शित करण्याची जागा, मुलांनी केलेले प्रोजेक्ट. हे सगळं खूप छान अनुभव देणारं, स्वतःच्या पूर्वानुभवात भर टाकणारं होतं. तिथल्या शाळेच्या वेळापत्रकात आठवड्यातून एकदा ग्रंथालयाचा तास असतो. आज चौथीचा तास होता चौथीची सगळी मुलं ग्रंथालयात आली. प्रदीप दादा मुलांबरोबर कवितेसाठी काम करणार होते. त्यासाठी त्यांनी पूर्वतयारी केली होती. विं. दा. करंदीकरांच्या “अजब खाना” पुस्तकातली “बक्षीस” कवितेसोबत प्रदिपदादा मुलांसोबत काम करणार होते. त्यांनी कवितेच्या एका एका ओळीच्या पट्ट्या तयार केल्या होत्या. त्यांनी मुलांना सांगितले की या ओळी वाचून त्याचा अर्थ लावून मग कविता क्रमामध्ये लावून झाल्यावर सादर करायची आहे. मुलांचे दोन गट तयार केले.कवितेचा पट्ट्या मुलांना दिल्या. मुलांनी कवितेचा क्रम लावून कविता सादर केली. कवितेसोबत काम करताना कवितेच्या आधी काय बोलायचं, कवितेनंतर काय बोलायचं हे दादांनी आधीच आखून ठेवलं होतं. मुलांच्या चुकांवर जास्त भर न देता प्रदीप दादांनी मुलांच्या प्रयत्नाचे कौतुक केलं. नंतर “अजबखाना” या पुस्तकाची ओळख करून दिली आणि या कवितेवर चर्चासुद्धा झाली. मुलांबरोबर ज्यावेळी असं काम होतं तेव्हा ते नकळत मुलांच्या आणि मोठ्यांच्यासुद्धा कितीतरी खोलवर रुजतं. चिंचा, आवळे पाहिले की या कवितेची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
दुपारच्या सत्रात ओळख झाली ती विद्या ताईंसोबत. पाचवी ते दहावीच्या मुलांसोबत कसे काम करतात याची ताईंनी सविस्तर माहिती दिली. आमच्यासुद्धा उचापती, कोणत्याही वस्तूला प्रश्न विचारा, दिलेल्या माहितीवरून अंदाज लावून गोष्ट लिहून द्या, अशी मुलांची तयार केलेली पुस्तके त्यांनी दाखवली. मुलांनी खूप वेगळा विचार केला होता. या पुस्तकात मुलांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटलेले दिसत होते. दरवर्षी निघणारं “नवनीत” वार्षिक ताईंनी आम्हाला दाखवलं. या शाळेची सगळी मुलं पुस्तकांबरोबर, या पुस्तकांच्या समृद्ध वातावरणात वाढताना पाहून खूप छान वाटत होतं, आनंद वाटत होता आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला हे वातावरण मिळावं, असं समृद्ध वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण व्हावं असं मनोमन वाटत होतं. हे सगळं पाहताना, डोळ्यात साठवून ठेवताना शैलजा मेनन यांचं वाक्य आठवलं, “साहित्य असा आरसा आणि खिडकी आहे की, ज्यामुळे मुलांमध्ये उच्च स्तरावरचं चिंतन निर्माण होऊ शकेल. उद्देशपूर्वक लिखाणं शब्दसंग्रह वाढून वाक्य बारकाईने लिहिण्याचे कौशल्य साहित्य वाचल्यामुळे आणि त्याची सवय लावून घेतल्यामुळे होते” या सगळ्या गोष्टी आम्हाला या लायब्ररीत पाहायला मिळाल्या. विद्याताईंनी आम्हाला मुलांनी केलेले प्रोजेक्ट दाखवले. 1994 पासूनचे मुलांचे प्रोजेक्ट त्या शाळेने जपून ठेवलेले आहेत. सातवीतल्या दोन मुलींनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि आधुनिक शेतकरी यावर केलेला प्रोजेक्ट आम्हाला दाखवला. त्यातल्या मला आवडलेल्या गोष्टी म्हणजे आतापर्यंत झालेली शेतकरी आंदोलनाची कात्रणं, शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येचे कात्रणं, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेले ॲप या गोष्टींचा समावेश या प्रोजेक्टमध्ये होता शिवाय कृषी अधिकाऱ्यांची मुलाखत, शेतकऱ्यांच्या समस्या याचाही समावेश होता.त्याच बरोबर मुलांनी केलेल्या कविताही जागोजागी प्रोजेक्टमध्ये गुंफलेल्या पाहायला मिळाल्या. प्रोजेक्ट करताना प्रोजेक्टच्या प्रत्येक कंगोऱ्यावर मुलांनी सारासार विचार केला होता आणि त्यावर काम केलं होतं हे दिसलं.
पहिली ते दहावीपर्यंत ही शाळा आहे तरीही अगदी बारावीनंतरसुद्धा या ग्रंथालयांमध्ये मुले रेफरन्स् बुक शोधण्यासाठी येतात. हवी असणारी पुस्तके घेऊन स्वयंअध्ययन करतात. “स्वयंअध्ययन” ही शिक्षणातली उच्च पातळी. स्वयंअध्ययनापर्यंत मुलांना पोहोचवणारी ही लायब्ररी सगळ्यांनी एकदा तरी पाहायला हवी. सर्वांनी तिथे जाऊन या ग्रंथालयाचं काम पहायला हवं आणि आपल्या शाळेत, आपल्या कामात आपण अशा प्रकारची लायब्ररी कशी सुरू करू, आपल्या भागातल्या मुलांसाठी वाचन समृद्ध वातावरण निर्माण कसं करू याचा सर्वांनी विचार नक्कीच करायला हवा?
पाठ्यपुस्तक म्हणजे अभ्यास नाही, याला फाटा तर खूप लोक, खूप संस्था, खूप पालक, शिक्षक देतातच पण पाठ्यपुस्तकासोबत पाठाला कितीतरी पूरक वाचन देण्याचा प्रयत्न इथले शिक्षक करतात. वर्ग ग्रंथालय हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आम्हाला प्रचंड आवडला. प्रगत शिक्षण संस्थेचे अजून एक कौतुक म्हणजे “पुस्तकमैत्री अभ्यासक्रम” लवकरच ही संस्था सुरू करत आहे.प्रत्येकाच्या हातात पुस्तक आणण्याच्या त्यांच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा.
या… फलटणच्या इरावती कर्वे ग्रंथालयाला नक्की भेट द्या.
इरावती कर्वे ग्रंथालयासाठी संपर्क -
प्रकाश अनुभूले
9960460474
--
दीप्ती देशपांडे, संचालिका
आनंदी बालभवन, कोल्हापूर.
संपर्क - +91 9158998831
एक सलाम सदफ आणि राणी तुम्हाला
(दि. २८ ऑगस्ट २०२१, कुंभार्ली, चिपळूण.)
समाजसेवा आणि त्याचबरोबर निसर्गसेवा म्हणजे काय असत तर ते म्हणजे SRCO हेच. कसं काय जमत बुवा तुम्हाला हा मलाच एक प्रश्न पडला आहे. तसा मी दंगेखोर त्याचबरोबर विचारी माणूस आहे. पण आज ज्यावेळी घाट माथ्यावर पोहचलो त्या बायकांना पाहिलं, ती चिमुरडी मुलं त्याचबरोबर एक डोळा गेलेले ते काका. अरे बाप रे माझ्या आतल्या माणसाला लाज वाटली अशीच काही ती परिस्थिती माझी झाली. कोल्हापूर पर्यंत पोहचेपर्यंत आणि आता या भावना मांडे पर्यंत मी त्या घाट माथ्यावरच आहे. सगळी मुलं देवाची, मग कोण असं का राहतं? हा प्रश्न मी त्या भगवंताला विचारत आहे. पण भगवंताने आयुष्य पूर्णरूपी निसर्गात जगायचं वरदान त्या आदिवासी पड्यातल्या लोकांना दिल आहे हे मात्र नक्की. ते जीवन तो आर्त सर्व काही देणारा निसर्ग त्या लोकांच्या जवळ आहे आणि त्यासाठी आम्हाला पैसे आणि वेळ मोजावा लागतो. आणि तो वेळ पण फार तर 2-4 दिवसाचा तेवढाच काय तो आमचा आनंद. पण मंदार वैद्य साहेबांच्या मूळे आपण भेटलो हेच माझे भाग्य म्हणेन.
तुम्ही करत असलेले काम वंदनीय आहे. त्याची तुलना मी कोणाशीच नाही करू शकत किंबहुना ते करणेच चुकीचे आहे. मी इतकी वर्षे जी काय सेवा करतोय त्याला खऱ्या अर्थाने आता पालवी फुटू लागलीये; त्याचे श्रेय मी आम्रपाली मॅडम ना देईन. १ महिन्याच्या ओळखीत आम्ही Care for Smile हा प्रोजेक्ट कुंभार्ली साठी आखला. त्याची सुरवात एक महिण्यामागे झाली आणि आता तो नावारूपाला येईल हे मात्र नक्की. आश्वासन देणं माझ्या रक्तात नाही बसत पण तुमच्या साठी तळमळ ही खरच मनापासून आहे नक्की आम्ही काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करू हे नक्की.
सागर ओतारी
ओझोन मेडिकेअर
मित्र श्री. सागर ओतारी यांची ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया.
झोमॅटो फिडींग इंडिया, ओझोन मेडिकेअर, श्रीमंत जिजाऊ फौंडेशन यांच्या पुढाकाराने आणि SRCO च्या सहकार्याने काल दि. २८ ऑगस्ट २०२१ रोजी यशवस्वीरित्या पार पडलेल्या "देणगी स्वरूपात जमा झालेली मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्याच्या सत्कार्यात" आपल्या संस्थेने एक छोटा वाटा उचलला याचा मनस्वी आनंद आहे. येथून पुढे देखील आम्ही या कार्यात नक्कीच सहभागी असू.
-
विशाल चंद्रशेखर बेलुरे
विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,
नांदेड.